बोधकथा - भगवान बुद्ध (1)



ज्ञानवर्धक बोधकथा

भगवान बुद्ध

         भगवान बुध्दा सोबत एक लहान मुलगा बसलेला असतांना त्यावेळेस तिथून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने भगवान बुध्दांना विचारले "तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत?"

बुध्द म्हणाले "तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल".

थोड्या वेळा नंतर त्या नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच बुध्दांना म्हणाला " तो बघा अजून एक चोर आला",

बुध्द म्हणाले "तो राजा आहे."

       मुलगा बुध्दांना म्हणाला " या दोघात काय फरक आहे ? राजा भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई होते."

     बुध्द म्हणाले "जमीन आसमानचा फरक आहे, त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वातंत्र नाही, शिपाई जिकडे नेतील तिकडे जायचं, शिपाई जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतःच्या मनाने काहीच करता येत नाही. कारण तो बंदिस्त आहे.....परंतु राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत, राजा सांगेन तिकडे ते राजा बरोबर जातील, राजा जे काही सांगणार ते सर्व ते करणार, जर राजा बोलला कि तुम्ही जा, मला एकटे राहू देत, तर निघूनही जातील, कारण राजा मुक्त आहे."

      "आपले मन, आपल्या भावना म्हणजे द्वेष, तिरस्कार, राग, लोभ, मत्सर, अहंकार, असूया, कपट, गर्व हे सर्व विकार आपले शिपाई आहेत, आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण 'चोर' आहोत,

   ते आपल्या ताब्यात असले तर आपण 'राजा' आहोत.