कर्मवीर भाऊराव पाटील

 



कर्मवीर भाऊराव पाटील


      कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म.२२ सप्टेंबर १८८७ मध्ये  कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज येथे या छोट्याशा गावी झाला होता. त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील ‘ऐतवडे’ हे होते. पण काही कारणास्तव त्यांचे पूर्वज कुंभोज येथे स्तलंतरित झाले होते.त्यांचे प्राथमिक शिक्षण ‘विटा’ या गावी झाले. 

      पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी शिक्षण घेत असतानाच  महात्मा जोतिबा फुले, विठ्ठल रामजी शिंदे व राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यामुळे ते प्रभावित झाले. याच दरम्यान त्यांचा सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीशी परिचय झाला व ते सत्यशोधक समाजाचे अनुयायी बनले.त्यांनी तेथे कार्य देखील केले. 

      भाऊराव पाटलांनी ओगले ग्लास वर्क्सर, किर्लोस्कर ब्रदर्स या कंपन्यांचे फिरते विक्रेते म्हणून काम करीत असताना संपूर्ण महाराष्ट्रभर फिरण्याचा योग आला. त्यांच्या भ्रमंतीमुळे त्यांना ग्रामीण विभागातील जनतेच्या प्रचंड दारिद्रयाची, भयंकर अज्ञानाची व अंधश्रद्धेची जाणीव झाली.त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील गरिबी जवळून बघितले.गोरगरिबांच्या शिक्षणाची दयनीय अवस्था पाहून त्यांचे मन अस्वस्थ झाले. गोर गरीब जनता अजूनही खूप मागास राहिली आहे.त्यांच्या जीवनात अनंत अडचणी आहेत.त्यांच्या या बहुतेक समस्यांवर ‘शिक्षण’ हा एकमेव महत्त्वाचा उपाय आहे असा विचार त्यांनी केला.जर या लोकांच्या जीवनातील समस्या दूर करायच्या असतील तर अगोदर त्यांना शैक्षणिक दृष्टया समृध्द केले पाहिजे.

       ग्रामीण भागातील प्रश्न जर सोडवायचे असतील तर तेथे शिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत जरूरीचे आहे असे त्यांना वाटते असे.गोरगरिबांच्या शिक्षणासाठी  म्हणून त्यांनी १९१९ मध्ये ‘रयत शिक्षण संस्थेची’ स्थापना केली. रयत या शब्दांमध्ये सर्वसामान्य जनता आणि तिचे कल्याण असा भाव त्यांना अपेक्षित होता. गोरगरिबांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे असं त्यांना नेहमी वाटतं. समाजातील सर्व जातीच्या मुलांना, गरीब शेतक-यांच्या मुलांना शिक्षण घेता यावे असा प्रयत्न त्यांनी केला. त्यांनी त्यांच्या शिक्षण संस्थेत कधीच कसला जातीभेद केला नाही. संस्थेच्या वतीने सातारा येथे ‘छत्रपती शाहू बोर्डिग हाऊस’ हे वसतिगृह सुरू केले.या वसतिगृहाचे काम स्वतः भाऊराव पाहायचे.येथे गोरगरिबांच्या अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी संपूर्ण सोय करण्यात आली होती.सर्वजण त्यांना प्रेमाने अण्णा असे म्हणत. अण्णा गोरगरिबांच्या मुलांवर आई वडीलांप्रमाणे प्रेम करत असत. त्यांनी ओळखले की जर मुलांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण द्यायचे असेल तर अगोदर प्राथमिक शिक्षक गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेतलेले असले पाहिजे. म्हणून त्यांनी प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सातारा येथे ‘सिल्व्हर ज्युबिली रूरल ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.

       मुलांनी शिक्षण घेत असतानाच स्वत स्वावलंबी असले पाहिजे असा आग्रह अण्णांनी धरला होता. स्वतः कमावून शिक्षण घेतले पाहिजे असे त्यांना सतत वाटत.  म्हणून त्यांनी ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हे रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य ठेवले. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहून शिक्षण घ्यावे म्हणून त्यांनी ‘कमवा व शिका’ ही योजना सुरू केली. विद्यमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी जे कमवा व शिका योजना सुरू आहे त्या योजनेचे नाव कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजना असे आहे. 

       बॅरिस्टर पी जी पाटील पुण्यामध्ये  महाविद्यालयात शिक्षण घेत असताना अण्णा त्यांना भेटावयास आले. त्यावेळी पाटील सर आणि एम ए इंग्रजी वर्गातील सर्व विद्यार्थी शिक्षक इंग्रजी सिनेमा पाहण्यासाठी जाणार होते. प्रत्येक आलेले  अण्णा म्हणाले मी पण येतो. सिनेमा सुरू झाला त्यातील एक प्रसंग असा होता सेनापतीला गोळी लागली मात्र त्याच्या हाती ध्वज होता. आपण पडलो तरी चालेल आपल्या सैन्याचा ध्वज पडता कामा नये म्हणून तो दुसऱ्या सशक्त सैनिकाकडे ध्वज देण्यासाठी प्रयत्न करत होता. दुसऱ्या सैनिकाच्या हवाली केल्यावर तो खाली कोसळला. हा प्रसंग पाहताच  अण्णा म्हणाले पाटील रयत शिक्षण संस्थेची धुरा अशा सक्षमपणे सांभाळणारा वारसदार आपल्याला निर्माण केला पाहिजे. कोणत्या प्रसंगातून काय घ्यावे हे ज्याला कळले त्याला शिक्षण नावाची गोष्ट कळली.

      अण्णा म्हणत शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ आहे. शिक्षणाने माणूस बहुश्रृत व विवेकी बनतो. एखाद्या कुटुंबाचा विकास करायचा असेल तर त्या कुटुंबातील मुलांना शिक्षण दिलेच पाहिजे. शिक्षणाने माणूस व त्याचे संपूर्ण कुटुंब समृद्ध बनत असते अशी धारणा अण्णांची होती.

       शिक्षण हे साध्य नसून, साधन आहे असे अण्णा मानत असे. भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी नुसते डोक्यावरचे केस वाढवायचे नसतात, तर त्याने डोक्यातले विचार वाढविले पाहिजे, असे त्यांचे मत होते.

       समतेच्या तत्त्वांचा त्यांच्या संस्थेमार्फत व व्याख्यानामार्फत त्यांनी प्रसार केला. शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व बहुजन समाजाचा सर्वागीण विकास हीच उद्दिष्टय़े भाऊरावांनी डोळ्यासमोर ठेवली होती. प्रत्येक गावात शाळा, बहुजन समाजातील शिक्षक व शिक्षक प्रशिक्षण या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.  

       एकदा वस्तीगृहामध्ये अण्णा यांचे कामकाज पाहण्यासाठी एक मोठी राजकीय व्यक्ती आली. त्यांना अण्णांनी जेवणाचे आमंत्रण दिले. भाजी थोडी तिखट होती. त्यावर अण्णा म्हणाले अरे महाराजांना पेढा घेऊन या. रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ आहे.  त्यांचा पेढा म्हणजे रात्रीच्या उरलेल्या भाकरीला तव्यावर गरम करून त्यात थोडा गुळ घालून त्याचे लाडू बनविणे किंवा पेढ्याच्या आकाराचे लहान लाडू बनविणे. खरोखर अण्णा आपण धन्य आहात. आपल्या एकट्याचा दृष्टीमुळे महाराष्ट्र भूमितील लाखो लोकांचे जीवन सुजलाम सुफलाम झाले आहे. आज आम्हा सर्वांच्या घरातील चूल पेटते आणि दोन घास जेवणाचे मिळतात ते आपल्यामुळे आम्ही आपल्या प्रति तन-मन-धनाने कृतज्ञता व्यक्त करत आहोत. यासाठी आपले स्थान ईश्वराप्रमाणे आहे.  आपण खऱ्या अर्थाने रयत शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आणि त्याच्या परिवाराच्या हृदयात आहात. 

      कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्वातंत्र्यलढयात सुद्धा भाग घेतला होता. त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीसाठी भूमिगत पुढा-यांना बरीच मदत केली. त्यांनी स्वतंत्र लढ्यात हिरे देणे सहभाग घेऊन महत्त्वाचे कार्य केले आहे. मात्र त्यांना शैक्षणिक क्षेत्रात आवड असल्याकारणाने अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी झटत राहिले. म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांना ‘कर्मवीर’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे.

        आज देखील संपूर्ण महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमार्फत अनेक ठिकाणी संस्था शैक्षणिक कार्य करण्याचे पवित्र काम करत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेमार्फत मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम आजही महाराष्ट्रभर चालू आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचं आज महाराष्ट्रभर वटवृक्षांमध्ये रूपांतर झालेला आहे. हा वटवृक्ष गोरगरिबांच्या मुलांना छाया देण्याचे काम आज देखील अविरतपणे करत आहे. भाऊरावांच्या कार्याची दखल घेऊन त्याला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात देखील आले ते हयात असताना त्यांना मिळालेल्या पुरस्काराची रक्कम ते गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरत असत.

       भारत सरकारने ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन त्यांना सन्मानित केले. पुणे विद्यापीठाने त्यांना १९५९मध्ये ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ ही पदवी देऊन त्यांच्या कार्याचा सत्कार केला. असा थोर व्यक्ती समाज पुरुष गोरगरिबांच्या मुलांचा कैवारी अनाथांचे आई वडील असलेले भाऊराव पाटील यांचे निधन ९ मे १९५९ रोजी झाले. त्यांचा देह जरी अनंतात विलीन झालेला असला तरी ते त्यांच्या शैक्षणिक संस्थारुपी कार्यात आज देखील जिवंत आहेत.

Tags: