जाणून घ्या गणेशोत्सवाबद्दल सविस्तर माहिती.

 


जाणून घ्या गणेशोत्सवाबद्दल सविस्तर माहिती. अष्टविनायकाची  माहिती.

          गणेशोत्सव म्हटले की अगदी लहानापासून वृद्धांपर्यंत कुतूहल असते.सर्वजण हा उत्सव साजरा करण्यासाठी आतुर असतात.या कालावधीत सर्वांच्या घरी भक्तिमय वातावरण असते.महाराष्ट्र, गुजरात आंध्रप्रदेशात हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्याच्या चौथ्या दिवशी (साधारणत ऑगस्ट, सप्टेंबर या काळात ) गणेश चतुर्थी येते. घराघरात गणपतीची  मूर्ती आणली जाते व 11 दिवस मोठ्या भक्तीभावाने तिची पूजा केली जाते. या काळात रोज सकाळी व संध्याकाळी त्याच्यापुढे आरती म्हटली जाते.

       गणपती ही संघटनेची देवता आहे.ऋग्वेदात ब्रह्मणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी १८९४ साली केली. त्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते.इंग्रज सार्वजनिक ठिकाणी लोकांना एकत्र येऊ देत नव्हते. लोकांना एकत्र येता यावे विचारांची देवाण घेवाण करता यावी या हेतूने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात.

       लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती.भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगांचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या प्रयत्नांना यशही आले.पण आज गणेशोत्सवाचे स्वरूप पूर्णतः बदललेले आहे.


        महाराष्ट्रात अष्टविनायक प्रसिद्ध आहेत.अनेक जण अष्टविनायकाच्या दर्शनाला जात असतात.अष्टविनायकाची नावे खालीलप्रमाणे आहेत.


1. मोरेश्वर - मोरगाव पुणे

2. चिंतामणी - थेऊर पुणे

3.गिरिजात्मक - लेण्याद्री गणपती, पुणे

4. विघ्नेश्वर - ओझर गणपती, पुणे

5. महागणपती - रांजणगाव पुणे

6.बल्लाळेश्वर पाली गणपती, रायगड

7. वरदविनायक महाड

8. सिद्धटेक - सिद्धिविनायक गणपती



गणपतीचे विविध अवतार

       उपपुराण मानल्या जाणार्‍या व गाणपत्य संप्रदायाचे मुख्य ग्रंथ असलेल्या गणेश पुराण व मुद्गल पुराण- ह्या दोन ग्रंथात गणपतीच्या अनुक्रमे चार व आठ अवतारांचा उल्लेख आहे.


    गणेश पुराण – गणेश पुराणात- गणपतीचे चार अवतार अनुक्रमे सत्य, त्रेता, द्वापर व कलियुगात झाले असा उल्लेख आहे. हे होते -

    महोत्कट विनायक – हा दशभूजाधारी व रक्तवर्णी अवतार. वाहन सिंह. कश्यप , .दिती यांच्या सन्तान म्हणून जन्मग्रहण केले व त्या कारणाने काश्यपेय नावाने प्रसिद्ध झाला.या अवतारात त्याने नरान्तक आणि देवान्तक नावाच्या दोन असुर भावांचा व धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला.

    मयूरेश्वर – हा सहा भुजांचा व श्वेतवर्णी अवतार आहे. याचे वाहन मोर आहे. त्रेतायुगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून हा जन्मला. या अवतारात सिंधू नामक दैत्याचा त्याने वध केला. अवतारसमाप्तीच्या वेळी आपले वाहन असलेला मोर त्याने त्याचा भाऊ कार्तिकेय यास दान केला अशी आख्यायिका आहे. मोरगाव येथे मोरेश्वराचे मंदिर आहे.

    गजानन – हा चतुर्भुज व रक्तवर्णी अवतार. वाहन उंदिर. द्वापार युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंदूर नामक दैत्याच्या वध केला. अवतार समाप्तीच्या वेळेस राजा वरेण्य यास गणेश गीता सांगितली.

    धूम्रकेतु – द्बिभूज अथवा चतुर्भूज व धूम्रवर्णी अवतार. वाहन निळा घोडा. हा अवतार कलियुगाच्या शेवटी अवतीर्ण होईल व अनेक दैत्यांचा नाश करेल असे सांगितले जाते. विष्णूच्या कल्की अवतारावरून कल्पित.

   मुद्गल पुराण – मुद्गल पुराणात- गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन सापडते. दुर्गुणांवरील विजय असा त्याचा भावार्थ आहे. हे अवतार खालील प्रमाणे -

   वक्रतुण्ड – हा प्रथम अवतार. याचे वाहन सिंह असून या अवतारात मात्सर्यासुराचा (अर्थात मत्सराचा) वध त्याने केला अशी आख्यायिका आहे.

   एकदन्त – आत्मा व परमब्रह्माचे प्रतीक म्हणून हा अवतार ओळखला जातो. हा मूषकवाहन असून अवताराचा उद्देश्य मदासुराचा (अर्थात, मद/मी-पण) वध त्याने केला अशी आख्यायिका आहे.

   महोदर – वक्रतुण्ड व एकदंताचे सम्मिलित रूप. बह्माच्या प्रज्ञेचे प्रतीक. मोहासुर (अर्थ मोह) याचा वध केला. हा अवतारही मूषकवाहन आहे.

गजवक्त्र वा गजानन – महोदर अवताराचे अन्यरूप. लोभासुर (लोभ) याचा वध केला.

    लम्बोदर – ब्रह्माच्या शक्तीचे प्रतीक.वाहन मूषक. क्रोधासुराचा वध केला.

विकट – सूर्याचे प्रतीक. कामासुराचा वध केला. वाहन मयूर.

   विघ्नराज – विष्णूचे प्रतीक.ममासुराचा (अहंकार) वध हा या अवतारचे उद्देश्य.

   धूम्रवर्ण – शिवाचे प्रतीक. ब्रह्माच्या विनाश शक्तीचे प्रतीक. वाहन घोडा.अभिमानासुराचा नाश केला.


विविध पुराणांतील गणपतीच्या आख्यायिका


देवीपुराण –


      शिवपुराणात उल्लेखित उपाख्यानानुसार, पार्वतीने एकदिवशी नंदीस द्बारपाल म्हणून नियुक्त करून स्नान करण्यास गेली. यावेळी शंकर तेथे आले. त्यांनी नंदीस झुगारून न्हाणीघरात प्रवेश केला. यामुळे पार्वती अपमानित व रागाने क्षुब्ध झाली. शेवटी सखी जया व विजया यांच्या सल्ल्याने चिखलापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती निर्मिली व त्यात प्राण फुंकले. या पुत्रास तिने स्वतःचा अनुचर म्हणून नेमले. नंतर एकेदिवशी या कुमार मुलास द्वारपाल नेमून पार्वती स्नानास गेली असता शंकर तेथे उपस्थित झाले. त्यावेळी या कुमाराने शंकरास अडवले. पहिल्यांदा कुमारासोबत त्यांचा वाद व नंतर पार्वतीच्या मनातील इंगिताप्रमाणे युद्ध झाले. शिव व सकल देवतागण या लढाईत पराजित झाले. तेव्हा नारदाच्या सल्ल्याने विष्णूद्वारे कुमारास मोहित करून शंकरांनी त्याचे मुंडके उडवले. ही वार्ता ऐकून पार्वतीने क्रुद्ध होऊन सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला. नारद व देवगणांनी पार्वतीला शांत केले. तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुनर्जीवनाची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. शंकरांनी त्यास होकार दिला परंतु कुमाराचे मस्तक कोठेही न मिळाल्याने त्यांनी गणांस उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली. गण एका हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले. देवगणांनी ह्या मुंडक्याच्या साहाय्याने कुमारास जिवंत केले. तदपरांत शंकरांनी या मुलास स्वपुत्र म्हणून स्वीकारले. देवगणांच्या आशिर्वादाने हा मुलगा पूज्य झाला व गणेश नावाने प्रसिद्ध झाला.


स्कंदपुराण -


    स्कंदपुराणात- गणपतीच्या जन्माविषयी एकाधिक उपाख्यान वर्णिली आहेत. या पुराणातील गणेश खण्डाप्रमाणे सिन्दूर नामक एक दैत्याने पार्वतीच्या गर्भात प्रवेश करून गणेशाचे मस्तक छिन्न केले. पण या अर्भकाचा मृत्यु न होता ते मुण्डहीन अवस्थेत जन्माला आले. नारदाने बालकास याचे कारण विचारले असता गजाननाने वरील घटना सांगितली. तेव्हा नारदांच्या सल्ल्यानुसार गजासुराचे मस्तक छिन्न करून गणपतीने ते मस्तक स्वतःच्या शरिरावर चढवले.


       स्कंदपुराणाच्या ब्रह्मखण्डातील कथेनुसार, पार्वतीने स्वतःच्या मळापासून एक सुन्दर व पूर्णांग बालकाचा पुतळा निर्मिला व त्यात प्राण फुंकले व त्यास आपला द्वारपाल नेमून ती स्नानास गेली. या बालकाने नंतर तेथे स्नानागारात जाणाऱ्या शंकरास अडवले. त्यावेळी या बालकाचे शंकरासोबत युद्ध झाले व त्यात शंकरांनी बालकाचे मस्तक छिन्न केले.या नंतर गजासुराचा वध करून शंकरांनी त्याचे मस्तक बालकाच्या धडावर बसवले.

       स्कंदपुराणाच्या- अर्बुद खण्डात म्हटले आहे की, पार्वतीने अंगमळापासून एक मस्तकहीन पुतळा बनवला. कार्तिकेयाने ह्या पुतळ्यास स्वतःचा भाऊ बनवण्याची इच्छा व्यक्त केली व त्याने एक गजमुण्ड आणले. पार्वतीचा आक्षेप असतानाही दैवयोगाने हे मस्तक धडाशी जोडले गेले. यानंतर शक्तिरूपिणी पार्वतीने पुतळ्यास जीवनदान दिले. गजमुण्डयुक्त पुतळ्यावर नायकत्वाचा एक विशेष भाव उमटला त्यामुळे तो महाविनायक नावाने परिचित झाला. शंकरांनी या पुत्रास गणाधिपती होशील व तुझ्या पूजेविना कार्यसिद्धी होणार नाही असा आशीर्वाद दिला. कार्तिकेयाने त्यास कुर्‍हाड दिली. पार्वतीने मोदकपात्र दिले व मोदकाच्या वासाने उंदीर गणपतीचे वाहन बनला.


बृहद्धर्मपुराण –


       बृहद्धर्मपुराणाप्रमाणे पार्वती पुत्रलाभासाठी इच्छुक असताना शंकरांनी अनिच्छा प्रकट केली. पुत्राकांक्षी पार्वतीस शंकरानी एक वस्त्र फाडून दिले व पुत्रभावाने चुंबन करण्यास सांगितले.पार्वतीने त्याच वस्त्रास आकार दिला व त्यास जिवंत केले. तेव्हा हा पुत्र अल्पायू आहे असे उद्गार शंकरांनी काढले. मुलाचे मस्तक तत्क्षणी छिन्न झाले. यामुळे पार्वती शोकाकुल झाली. या वेळी उत्तरदिशेस असलेल्या कोणाचेही मस्तक जोडले असता हा पुत्र वाचेल अशी एक आकाशवाणी झाली. तद्नुसार पार्वतीने नंदीस उत्तरेत पाठवले. नंदीने देवतांचा विरोध झुगारून इंद्राचे वाहन असलेल्या ऐरावताचे मस्तक कापून आणले. शंकरांनी हे मुंडके जोडून पुत्रास जिवंत केले. शंकरांच्या वराने इंद्राने ऐरावतास समुद्रात टाकले असता त्यासही पुनः मस्तक प्राप्त झाले.